लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसर आणि हडपसरमधील शेवाळवाडी भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यात कुणाचा मृत्यू झाला नाही. परंतु शेवाळवाडी येथे पायात गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. १६) आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची शाळा भरवून सर्वांना तंबी दिली. अशातच जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाइट्स येथे दुपारी गोळीबाराची घडना घडली. धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८) यांच्या तक्रारीनुसार, दोघांवर गुन्हा दाखल केला. धीरज हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कारजवळ असताना दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.
एक जण जखमी दुसरी घटना बुधवारी शेवाळवाडी येथे घडली. व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) हे जखमी झाले आहेत. सुधीर रामचंद्र शेडगे (रा. शेवाळवाडी) याला अटक केली आहे.