पुणे : शहरात कोयत्याने वार करून खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापतीच्या घटना घडत असतानाच गोळीबाराच्या घटनांनीही डाेके वर काढले आहे. सोमवारी रात्री कल्याणीनगर येथे शेकोटी पेटवल्याने गोळीबाराची घटना घडली, तर सिंहगड रोडला बांधकाम व्यावसायिकाने गोळीबार केला.
कल्याणीनगर परिसरात शेकोटी करून बसलेल्या तरुणांनी केवळ एका व्यावसायिकाला ‘भय्या कहा के हो’ असे विचारल्याने त्या व्यावसायिकाने हवेत गोळीबार केला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या गोळीबारानंतर चिडलेल्या तरुणांनी व्यावसायिकाची कार फोडली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. अमित सत्यपाल सिंग (३१, रा. कल्याणीनगर) या व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून मारहाण व चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
अमित यांचा आइस्क्रीमचा व्यवसाय आहे. हडपसरला फॅक्टरी आहे. ते सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करून बाहेर फेरफटका मारण्यास गेले होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला काही तरुण शेकोटी करून बसलेले होते. सिंग हेही तेथे गेले, तेव्हा तरुणांनी त्यांना ‘कहा के हो’, अशी विचारणा केली. ते काही न बोलताच तेथून परतले. पण, कार घेऊन पुन्हा तरुणांकडे गेले. तरुणांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. कार थांबवून ते खाली आल्यानंतर तरुणांनी त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. तरीही तरुणांमध्ये व त्यांच्यात झटापट झाली. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली, तर तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्या असे तक्रारीत म्हटले आहे.
या उलट नवनाथ गलांडे यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांचे मित्र शेकोटी करून बसले होते. त्यावेळी अमित दारूच्या नशेत तेथे आले. आम्ही त्यांना ‘भय्या कहा के हो’ अशी विचारणा केली. त्याचा त्यांना राग आला. ते निघून गेले. पण, ते पुन्हा कार घेऊन आले. त्यांनी प्रश्न करणाऱ्या तरुणाला बोलावले आणि त्याच्यावर पिस्तूल रोखले. तेव्हा घाबरून त्यांनी त्यांचा हात धरला. त्यामुळे पिस्तुलातून हवेत गोळी झाडली गेली. त्यानंतर ते गाडी सोडून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्यासह येरवडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.