पुणे : शहरात अपघाताचे सत्र कायम आहे. लोणी काळभोर भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी बाजारमळा गावात घरासमोर अंगणात थांबलेल्या ज्येष्ठ महिलेला कारने धडक दिली. शांताबाई केरबा मोडक (वय ७३, रा. वडकी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. माेडक या दि. ३ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या मोडक यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.
दुसरी अपघाताची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. भरधाव टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक महेश करे यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालक प्रीतवर्धन दिवाकर शर्मा (वय २४, रा. गोदरेज सोसायटी, हिंजवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष शेंडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.