पुणे : पुणे : औंध येथील आंबेडकर वसाहतीत बेकायदेशीररित्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडर भरताना झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. भारत आणि इंडेन गॅसच्या लहानमोठ्या १०५ गॅस सिलिंडरचा साठा येथे आढळून आला. वसाहतीत ओम साई गॅस सेल अॅण्ड सर्व्हिस नावाचे दुकान आहे. तेथे मोठ्या व्यावसायिक सिलिंडरमधून लहान-लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना अग्निशामक दलाचे जवान पोचण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या ठिकाणी १८ भारत गॅसच्या आणि २ इंडेन गॅसचे व्यावसायिक सिलिंडर आढळून आले. तसेच लहान सिलिंडरच्या ८५ टाक्या हस्तगत करण्यात आल्या. यातील काही सिलिंडरमधून गळती होत होती. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अग्निशामक दलाला दुर्घटनेची माहिती समजली. अग्निशामक दलाच्या आठ जवानांनी अपघातग्रस्त ठिकाणाकडे तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या पथकात अधिकारी बाळकृष्ण जिल्हेवार, शिवाजी मेमाने, बापू मुंगसे, संजय कार्ले, वासुदेव आल्हाट, बाळू तळपे, शिवाजी लोखंडे यांचा समावेश होता.