नसरापूर : कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार महामार्गावरील ३० फूट खोल खड्ड्यात पडल्याने कारमधील दोन जण ठार झाले आहेत, तर अन्य पाच जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) येथे हा अपघात झाला.राजगड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील कार (एमएच १२-केवाय ०१३०) मधील आनंद पुरुषोत्तम सैनदाळे (वय ४२, रा. डीएसके विश्व, धायरी, पुणे) आणि वेदांत नितीन जगताप (वय २१, रा. दमण, गोवा) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. देवश्री आनंद सैनदाळे (वय ३४), आयुश्री सैनदाळे (वय ६), आर्यन सैनदाळे (वय १०), सिद्धांत महेंद्र जगताप (वय २२) आणि अनिरुद्ध नितीन जगताप (वय २३, रा. दमण, गोवा) हे पाच जण गंभीर जखमी आहेत.याबाबत शिंदेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनदाळे आणि जगताप हे एकमेकांचे नातेवाईक असून, ते सर्व २३ डिसेंबर रोजी मालवण येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये सुटीनिमित्त गेले होते. ते पुण्याकडे परतत असताना सिद्धांत जगताप हे गाडी चालवत होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास शिवरे येथे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार महामार्गावरील दोन रस्त्यांमधील मोरीच्या खड्ड्यात पडली. अपघाताच्या ठिकाणी दोन रस्त्यांच्या मधील मोरीवर महामार्गावरील पूल आहे; मात्र दोन्ही रस्त्यांच्या मधील ही सुमारे तीस फूट खोलीची मोरी रस्ताबांधणी करणाºयाकडून तशीच उघडी राहिली असून, तिला कठडे नाहीत.या मोरीवर संबंधित ठेकेदाराने संरक्षक कठडे नसल्यामुळे ही कार ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.फौजदार मोहन तलबार, पोलीस हवलदार संतोष शिंदे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. त्यातील आनंद सैंदाणे आणि वेदांत जगताप हे जागीच ठार झाले.
अपघातात दोन ठार; ५ जण जखमी, तीस फूट खोल खड्ड्यात कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:00 AM