यवत : पुणे - सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा (ता.दौंड) नजीक अनेक वाहने एकमेकांवर धडकली. अपघातात एका मारुती इको कारचा चक्काचूर होऊन दोघे मृत्युमुखी पडले. एक गंभीर जखमी झाला आहे. अपघात शनिवारी (दि. ७) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रॅक्टर चालक भाऊसाहेब रणजित चव्हाण (वय -२२, रा.अनुराज शुगर्स कारखान्याजवळ, यवत, ता.दौंड) याने यवत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन उरुळी कांचन येथून ऊस आणण्यासाठी जात होता. पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपूर फाटा येथे आला असता,पाठीमागून येणाऱ्या टँकरने (एम.एच.४३ ,वाय - ७३९३) जोरदार धडक दिली. धडकेमुळे ट्रॅक्टरचे तोंड सहजपूर फाटा बाजूकडे वळले आणि पुण्याकडून येणारा कंटेनर (क्र. एम.एच.१२, एल.टी.४१७८) याची धडक ट्रॅक्टरला बसली. ट्रॅक्टरची पुढची दोन्ही चाके तुटून कंटेनर जागीच थांबला. यानंतर कंटेनरच्या पाठीमागून येणारी इको कार कंटेनरवर धडकली. याचवेळी पाठीमागून अज्ञात ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारचा दोन्ही वाहनांमध्ये चक्काचूर झाला. कारला धडक दिल्यानंतर ट्रक घटनास्थळी न थांबता निघून गेला. मात्र जाताना ट्रक मागे घेत असताना सरकारी वाहन महिंद्रा गाडी (क्र. एम.एच.१२, एन यू.३५०८) या गाडीला समोरून धडक देऊन पळून गेला.
भीषण अपघातात इको कारचा चक्काचूर झाल्याने अपघातात ओंकार आण्णा गवंड (वय- ३० , रा.रावणगाव, ता.दौंड) व वीरेंद्रसिह यादव (रा.कुरकुंभ, ता.दौंड) हे जागीच मृत्युमुखी पडले. कैलास रामचंद्र भागवत हे गंभीर जखमी झाले. अपघात ग्रस्तांना पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले.