घोडेगाव - भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील पुणे-नाशिक हमरस्त्यावर पुण्याहून नाशिककडे जाणाºया कारला अपघात होऊन कारमधील दोघेजण जागीच ठार, तर दोघेजण जखमी झाले आहे. हा अपघात रविवार पहाटे ५ वाजता झाला. अपघातात द्राक्ष बागायतदार रमेश नामदेव सोनवणे आणि पोलीस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही आपले पुण्यातील कामे उरकून रमेश नामदेव सोनवणे (वय ५८, रा. खेडगाव, ता. दिंडोरी), बबन निवृत्ती तिडके (वय ५२, रा. कसबे सुकाणे. ता. निफाड), निवृत्ती बाबूराव काश्मिरे (वय ५४, रा. सातपूर, नाशिक), ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (वय ५२ रा. आंबेजानोरी, ता. दिंडोरी) हे सर्व नाशिककडे जात होते. पुणे-नाशिक हमरस्त्यावर तांबडेमळा-भोरवाडी येथे रस्त्यावर समोर कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचालक रमेश सोनवणे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगतचे डिव्हाईडर आणि लोखंडी बोर्ड तोडून रस्त्याच्या कडेला खड्ड्याच्या दिशेने उडून एका झाडाला धडकली.यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी यांनी मोबाईलच्या प्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेले असता रमेश सोनवणे, बबन तिडके यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ हे जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे.मयत रमेश सोनवणे यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.पोलीस कर्मचारी बबन तिडके यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा,दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताची फिर्याद ज्ञानेश्वर वाघ यांनी मंचर पोलिस ठाण्याला दिली.
कारच्या अपघातात दोघे ठार, भोरवाडी-अवसरी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:10 AM