दौंड : दौंड रेल्वेस्थानकातून दिल्ली-बंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची दोन लाखांची लूटमार करण्याची घटना आज घडली. दि.२ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मार्गस्थ होताना, सोलापूर दिशेला जात असताना दौंड ते भिगवण या लोहमार्गावर एका स्टेशनवर सिग्नल नसल्यामुळे ही गाडी थांबली. नेमक्या कुठल्या रेल्वे स्थानकाच्या सिग्नलवर गाडी थांबली याचा उलगडा झाला नाही. दरम्यान, या गाडीतून प्रवास करीत असलेल्या विजयलक्ष्मी बाबू (वय ४२) यांच्या गळ्यातील १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळविले असल्याची फिर्याद विजयालक्षमी बाबू यांनी दौंड रेल्वे पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविली आहे. रेल्वे सिग्नलवर गाड्या थांबविल्यामुळे यापूर्वी अनेक चोऱ्या झालेल्या आहेत. यासंदर्भात वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला कळवूनदेखील सिग्नलवर गाड्या थांबविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण आहे. खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, नगरसेवक नंदू पवार, नगरसेवक गुरुमुख नारंग, नगरसेवक बादशहा शेख, सोहेल खान, प्रशांत धनवे यांच्या उपस्थितीत गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाची बैठक झाली होती. या बैठकीत रेल्वे सिग्नलवर गाड्या न थांबविण्याच्या सक्त सूचना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंड रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या, तरीदेखील रेल्वे सिग्नलवर गाड्या थांबविण्याचे प्रकार सुरूआहेत. त्यामुळे लूटमारीचे प्रकार वाढत चालले आहेत. परिणामी रेल्वे सिग्नलवर रात्री-बेरात्री गाड्या थांबवू नये, अशी मागणी प्रवासीवर्गातून पुढे आली आहे. ————
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये महिलेची २ लाखांची लूटमार
By admin | Published: November 09, 2016 2:29 AM