जुन्नर - ओझर (ता. जुन्नर) येथे वीजवाहक तारा पडून उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा भाजून मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटला. परिणामी उसाच्या शेतात असलेल्या या दोन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. ओझरजवळील जगदाळे मळ्यातील राजेंद्र जगदाळे यांच्या उसाच्या शेतात आग लागली होती. सुनील कवडे यांनी वनविभागाला ही माहिती दिली. वनविभागाच्या वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे यांनी या आग लागलेल्या शेतात जाऊन मृत बिबट्याची पिले ताब्यात घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी या मृत बिबट्यांच्या पिलांचे शवविच्छेदन केले. ही बिबट्याची पिल्ले १ महिन्याच्या माद्या होत्या. शवविच्छेदनानंतर वनविभागाच्या हिवरे येथील गिब्सन उद्यानात या पिलांचे दहन करण्यात आले. दरम्यान, पिल्ले आगीत मृत झाल्याने या पिलांची आई या परिसरात पिलांच्या शोधात भटकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या वीज वितरण कंपनीचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. वीज वितरण कंपनीच्या सुरक्षा सप्ताहात हा प्रकार झाला आहे. वीजवाहक खांबांवर लावल्या जाणाºया फ्लेक्सने कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासंदर्भात जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी निवेदन दिले होते. तसेच सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही असे प्रकार झाल्याने त्यांनी अधीक्षक अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.