बेल्हा : गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथील नगर-कल्याण रोडजवळील विटभट्टी जवळील पोल्ट्रीच्या कोरड्या पाण्याच्या टाकीत पाण्याच्या तसेच भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्याचे बछडे पडले. घटनास्थळी वनविभाग तसेच बिबट्या निवारा केंद्राचे पथक पोहचले आहे. हे बिबटे लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईजवळ सोडण्यासाठी टाकीत शिडी लावण्यात आली असून या बिबट्यावर हे पथक लक्ष ठेवणार आहेत. या बाबतची माहिती अशी की गुळूंचवाडी हद्दीत बबु पठाण यांची पोल्ट्री आहे. या पोल्ट्री लगतच एक खोल पाण्याची टाकी आहे. पण ही टाकी सध्या कोरडी आहे. काल रात्री पाणी पिण्यासाठी किंवा भक्ष पकडण्यासाठी हे दोन बछडे जोरात धावले असता त्या कोरड्या पाण्याच्या टाकीत हे दोन बछडे पडले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी पोल्ट्रीचे कामगार येथील रस्त्याने चालले असताना त्यांना अचानक या टाकीतुन गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना पाण्याच्या टाकीत दोन बिबट्याचे बछडे पडलेले दिसले. त्यांनी ताबडतोप वनखात्याच्या कर्मचा-यांना ही माहिती दिली. या ठिकाणी वनपाल डी.डी.फापाळे, वनरक्षक जे.टी.भंडलकर, आनंदा गुंजाळ यांनी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हे एक ते दीड वर्षाचे दोन बछडे आहेत. त्यामध्ये एक नर व एक मादी असुन त्यांची आई या परिसरातच असण्याची शक्यता वनखात्याकडुन वर्तवण्यात येत आहे. ही कोरडी पाण्याची टाकी १५ ते २० फुट खोल आहे. त्यानंतर या ठिकाणी जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा, वनपरिक्षक अधिकारी बी. सी. येळे, डॉ. अजय देशमुख व रेस्क्यु टिमचे सदस्य या ठिकाणी हजर होते. या बछड्यांना शिडीच्या सहाय्याने वर काढण्यात येणार असुन त्यांना पुन्हा जंगलात त्यांच्या आईकडे सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहाणा-यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.