पाटेठाण (पुणे): राहूबेट परीसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली असून शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे राहू (ता. दौंड) नजीक असलेल्या नवलेमळा येथे गहू पिकाच्या बांधावर वन्यप्राणी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. आज राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडीमळा येथील शेतातही शनिवार (दि 12) रोजी सकाळी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राहू येथील नवलेमळा येथे काही शेतकरी शेतातील कामे करत असताना शनिवार (दि.१२) रोजी सकाळच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल गणेश पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले, विलास होले, पशुवैद्यकीय अधिकारी अनिल इंगोले यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला आहे. हे स्पष्ट होणार असून वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहे.