राजुरी : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील भटकळवाडी येथे भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबटे विहिरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागाचे अधिकारी आणि माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राच्या पथकाने दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या दोन्ही बिबट्यांना विहिरीबाहेर काढले.जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडला जातो. उसाच्या शेतीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या आहे. सध्या उसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्याचा अधिवास कमी झाला आहे. यामुळे बिबटे हे मानवीवस्तीकडे वळू लागली आहे. शुक्रवारी सकाळी भडकळवाडी येथील येथील जालिंदर बबन लेंडे यांच्या शेतात सकाळच्या सुमारास दोन बिबटे पडले. त्यांच्या शेतात ऊस तोडणी चालु असताना ऊस तोडणी कामगारांनी लेंडे यांच्या विहिरीमध्ये डोकवले असता त्यांना विहीरीत २ बिबटे पडल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती त्वरीत विहीरीचे मालक जालीदंर लेंडे यांना कळवले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन लेंडे संबंधित वन खाते अधिका-यांना व पोलीस स्टेशनला तात्काळ कळविले. यावेळी आळे, बोरी नारायणगाव वन खात्याचे अधिकारी खट्टे, भालेराव, खरगे, जे.बी.सानप यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली. तसेच माणिकडो येथील बिबट्या निवारा केंद्रातील रेक्सू पथकाचे डॉ. अजय देशमुख, ओतुर वन अधिकारी येले व वाईल्डलाईफचे अधिकारी यांनी सहभाग नोंदवुन बिबट्याची सुटका केली. या दोन बिबटयामधील एक बिबटया नर जातीचा असुन तो सात वषार्चा आहे तर मादी ३ वर्षाची आहे.>तालुक्यात तालुक्यात ऊस तोडणी अंतीम टप्प्यात आलेली असताना तालुक्यातील राजुरी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, रानमळा, जाधववाडी, शिरोली सुलताणपुर ही गावे बिबटया प्रवण क्षेत्रात मोडत आहे. या गावांमध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. तरी या परीसरातील पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भक्ष्याच्या शोधातील दोन बिबटे पडले विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 1:16 AM