पिंपरी : साथीदारांसोबत मिळून दोन जणांचा खून केल्याप्रकरणी मुख्य दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्याखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. ८) हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले होते. सुरज प्रकाश रणदिवे व किरण चंद्रकांत बेळामगी (दोघेही रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांड प्रकरणी खेडपोलिसांना पाहिजे असलेले आरोपी चिंचवडगाव येथील बस थांब्यावर येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सुरज आणि किरण या दोघांनी अन्य साथीदारांसोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्यांनी चौकशी दरम्यान दिली. दोघांना अटक करून खेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर, चेतन सावंत, विपुल होले, बाबा गर्जे, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
धारदार शस्त्राने वार करून हत्यादुहेरी हत्याकांड प्रकरणी मंगेश गुलाब सावंत (वय ३५, रा. शिरोली, पाईटरोड, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या एका मित्राने शनिवारी (दि. ८) फोन केला. शिरोली गावाच्या हद्दीत खापरदरा हरण टेकडी डोंगरावर एका लिंबाच्या झाडाजवळ दोन मुलांना मारून टाकलेले आहे, असे मित्राने फोनवरून सांगितले. २८ ते ३० वयोगटातील व्यक्तींचे मृतदेह तेथे आढळून आले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते.