पुणे : वीसहून अधिक वर्षांचे वय अन् २५ ते ३० फूट लांब असणारी पिवळ्या फुलांची वाघनखी (बिग्नोनिया ॲन्गिवस कॅटाय) वेल घोरपडी परिसरातील सोपान बागेत फुलली आहे. ही वेल दरवर्षी मार्च-एप्रिल या महिन्यात फुलत असते, मात्र यंदा जानेवारीमध्येच बहरली असून, निसर्गही लहरी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
सोपान बागेतील व्हिक्टोरीया रस्त्यावरील गोविंद होगे यांच्या घरासमोर ही वेल एका भल्यामोठ्या झाडावर बहरलेली आहे. गेली अनेक वर्षांपासून ही वेल वाढलेली आहे. या वेलीला दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पिवळी फुले येतात. फक्त तीनच दिवस हे फुले येतात आणि त्यांचा बहर संपतो, असे म्हटले जाते. गेल्या वर्षी हवामान लहरी झाले होते. पावसाचा काळही वाढला आणि थंडीही म्हणावी तशी पडलेली नाही. त्यामुळे कदाचित त्या हवामानाचा परिणाम म्हणून ही वेल दोन महिने अगोदरच फुलली असण्याची शक्यता आहे.होगे कुटुंबीय गेली वीस-पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी राहते. त्यांच्या घरासमोरच ही वेल वाढत आहे. वेलीचे खोड जाड झालेले असून, एखाद्या झाडाप्रमाणे वाढले आहे. यावरून त्याचे वय खूप असल्याचे स्पष्ट होते.==============================तीनच दिवस फुलांचे आयुष्य
सध्या संपूर्ण वेल पिवळ्या फुलांनी बहरलेली आहे. शनिवारपासून हा बहर आला असून, सोमवारी संपूर्ण फुले गळून जातील. त्यानंतर पुढच्या वर्षीच फुलांचा बहर येईल. या फुलांना वास नसून, फक्त रंगामुळे ते आकर्षक दिसतात, अशी माहिती गोविंद होगे यांनी दिली.
==================
ही वेल भिंतीवर वाढते. वाघांचे नखे जशी एखाद्या वस्तूला पकडतात, तसेच ही वेल भिंतीला पकडून वाढते. म्हणून याला वाघनखी वेल म्हटले जाते. शिवाजीनगर न्यायालयातील कमानीवर ही पसरलेली आहे. तसेच ब्रिटिश कौन्सिल इमारतीलगतही पहायला मिळते. मार्च-एप्रिलमध्ये याला फुले येतात. त्यांचा कालावधी खूप कमी असतो.- डॅा. श्रीकांत इंगळहळीकर, वनस्पती संशोधक