पुणे : महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी राबविलेल्या ‘अभय योजने’ ला आणखी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ देताना स्थायी समितीने सवलतीचे दोन टप्पे निश्चित केले असून, या दरम्यान थकबाकीदारांनी मिळकत कर भरला नाही तर संबंधितांवर पुढील काळात कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली़
‘अभय योजने’च्या काळात यापुर्वी मिळकतकराच थकबाकी भरणाऱ्या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेवर ८० टक्के सवलत दिली गेली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत अभय योजनेचा दुसरा टप्पा राबविला जाणार असून, या कालावधीत कर भरणाºयांना मिळकतकराच्या दंडावर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे़ तर त्यानंतर १ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत अभय योजनेचा तिसरा टप्पा राबविला जाईल. यामध्ये दंडावरील रक्कमेत ७० टक्क्यापर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सवलत पुर्वी प्रमाणेच ५० लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतींनाच दिली जाणार आहे़
-------------------
मिळकतदारांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यांना थकबाकी भरण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांबरोबर चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात असुन, बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित थकबाकीदार हा मिळकत कर जमा करेल अशी साधारण संकल्पना आहे़
हेमंत रासने
अध्यक्ष स्थायी समिती पुणे महापालिका
---------------------