पुणे : शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या ‘स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेस’ आणखी दोन महिने मुदतवाढ देण्यास स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली़, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
स्वच्छ संस्था पुणे शहरात सन २००८ पासून घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करीत आहे़ महापालिकेने या संस्थेशी प्रथम पाच वर्षे कालावधीसाठी याकरिता करार केला होता़ या कालावधीतील स्वच्छचे काम पाहून महापालिकेने आॅगस्ट २०१५ मध्ये पुन्हा पाच वर्षांसाठी करार केला़ ३१ डिसेंबर, २०२० मध्ये हा करार संपल्याने, स्वच्छकडून पुन्हा पुढील पाच वर्षासाठी करारनामा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ मात्र तेव्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती़
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नव्याने दोन महिने स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्यात आली आहे़ ही मुदत वाढ देताना समितीने सदर कामाकरिता ६५ लाख २३ हजार २१७ रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली आहे़ तसेच या काळात वर्गीकृत कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरापाठीमागे ७० रूपये आकारण्यास, झोपडपट्टीमध्ये प्रति झोपडी ५० कोटी महिना झोपडपट्टीधारकाकडून आकारण्यासह, कचरा वेचकास प्रति झोपडी प्रति महिना १० रूपये प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली़
-------------------------------