पुणे : कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला आहे. नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अपार्मेंट, नारंगी रस्ता, विरार. मुळ रा. कुलीना टुकुरा, जि. बरगर ओरिसा) आणि मोहम्मद सईद ईक्बाल हूसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे. याप्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. त्यामुळे आता एकूण अटक आरोपींची संस्था ६ झाली आहे. यापुर्वी शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, धावरीतांडा, नांदेड), फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब्बार आणि रोठोड यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने विविध भागातील सर्व आरोपी कोल्हापूर येथे आले. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याची घटना ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अॅड. चैत्राली पणशीकर यांनी केली होती.
कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडाप्रकरणी आणखी दोघे मुंबईतून ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 8:14 PM
कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे.
ठळक मुद्देमुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार