पुणे : पुणे दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून आणखी दोघा संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाली होती़. यापूर्वी एटीएसने शुक्रवारी पुण्यातील आकुर्डी आणि वानवडी भागातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती़.
मुंबईतून ताब्यात घेतलेल्या या दोघांना पुण्यात आणून अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़. दोघेही अल कायदा या संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय असून बांगलादेशात बंदी घालण्यात आलेल्या अनसरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेच्या सदस्यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती आहे़.
मोहम्मद हबीबऊर रेहमान हबीब उर्फ राज जेसुब मंडल (वय ३१, रा. सतानी पुष्काली इर्यानल, जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. वानवडी), मोहम्मद रिपन होस्सैन (वय २५, , रा. सतानी पुष्काली इर्यानल, जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी), हनान्न अन्वर हुसेन खान (वय २५, रा. बिराजीकुंदी, थाना पालोंग, जि. शरियतपूर, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे़. न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ .
हबीब हा सेंटरिंग सुपरवायझरचे, तर अन्य दोघे मजुरीचे काम करतात. गेल्या ५ वर्षांपासून ते बेकायदेशीरपणे पुण्यात वास्तव्य करीत होते. बांगलादेशातील अनसरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेच्या सदस्यांच्या ते संपर्कात आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे. त्यामुळे आरोपींचा दहशतवादी कारवायांशी संबंध आहे का? हे पोलिसांकडून पडताळले जात आहे.
बांगलादेशातील दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय दिल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. तसेच या दहशतवाद्यांसोबत ते मोबाईलवरुन संपर्क साधत असल्याचे समजले होते. संशयित वानवडी आणी आकुर्डी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने त्यानुसार शोध मोहिम राबविली. त्यातील एक जणाला वानवडी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यावर इतर दोघांचाही आकुर्डी परिसरात माग लागला. त्यांच्या चौकशीमध्ये ते अनधिकृतपणे येथे राहत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड व आधारकार्ड सापडली. यातील एक आरोपी शहरातील महत्त्वाच्या संरक्षण संस्थेच्या परिसरातच काम करतो.
आरोपींनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला असून, बनावट कागदपत्रांचा वापर करुन सिमकार्ड मिळविले आहे. त्या सिमकार्डचा गैरवापर केल्याचे तपासात दिसून येत आहे. आरोपींवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक अधिनियम, बनावट पारपत्राद्वारे भारतात प्रवेश करणे अशा विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.