पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश ढोरे आणि काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे यांच्यासह ८ जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गुरुवारी रात्री उशिरा भाजपामध्ये प्रवेश केला. खासदार संजय काकडे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश झाला असून, तो मनसे व काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभागांच्या रचनेचा आराखडा शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच प्रकाश ढोरे, सुनंदा गडाळे यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा भामरे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आबा सुतार, धनेश्वर वांजळे, काँग्रेसचे कार्यकर्ते केदार मानकर, मनसेचे कार्यकर्ते नवनाथ पठारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, संजय काकडे, विक्रम काकडे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षांतील नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेतला जात आहे, असे संजय काकडे यांनी स्पष्ट केले. भावी काळात शहरातील भाजपाच्या सर्व नेत्यांच्या प्रयत्नांतून महापालिकेवर भाजपाचा झेंडा निश्चित फडकावला जाईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.मनसेच्या शहराध्यक्षपदाची धुरा प्रकाश ढोरे यांनी सांभाळली होती. त्यांचे भाजपामध्ये जाणे पक्षाला मोठा धक्का मानला जातो. काँग्रेस पक्षाकडून महापालिकेमध्ये पदांचे वाटप करताना अन्याय झाल्याची भावना काँग्रेसच्या सुनंदा गडाळे यांच्याकडून वारंवार व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर, त्यांनीही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
आणखी दोन नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
By admin | Published: October 07, 2016 3:04 AM