पुणे : उत्तर भारतात तयार झालेल्या चक्रवाताच्या दोन प्रणाली तसेच दक्षिण तामिळनाडूपासून उत्तर कोकणापर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे सध्या देशाच्या ८० टक्के भागात अवकाळी पावसाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
काही ठिकाणी गारपीटही होत असून, राज्यातही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार असून, मराठवाड्यात शनिवारी गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे.
हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “पश्चिम अफगाणिस्तानातून जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात एक कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकत आहे. त्याचवेळी दक्षिण पश्चिम राजस्थान व कच्छच्या भागात हवेच्या वरच्या स्तरामध्ये चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. तसेच ईशान्य राजस्थानातही चक्रवात तयार झाले आहे. दक्षिण तामिळनाडूपासून उत्तर कोकणापर्यंत एक द्रोणीय रेषा (कमी दाबाचा पट्टा) तयार झाला आहे. परिणामी बंगालच्या उपसागरावरून मध्य व दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणली जात आहे. परिणामी हा अवकाळी पाऊस होत आहे.”
असा असेल अंदाज
मध्य महाराष्ट्र : शनिवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता. जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर जिल्ह्यांत यलो अलर्ट. रविवारी व सोमवारी हलका पाऊस.
कोकण : रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, शनिवारपर्यंत यलो अलर्ट.
मराठवाडा : सोमवारपर्यंत सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, शनिवारपर्यंत यलो अलर्ट.
विदर्भ : मंगळवारपर्यंत सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत यलो अलर्ट. सोमवारनंतर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.