"पुण्यात आणखी दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करा" ; अजित पवारांच्या पीएमआरडीएला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:10 PM2021-08-29T15:10:12+5:302021-08-29T15:10:28+5:30
हडपसर, चाकण पट्टयात पायाभूत सुविधेसाठी पीएमआरडीएला सूचना
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने हाेत आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात आणखी दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) यादृष्टीने हडपसर आणि चाकण पट्ट्यात पायाभूत सुविधाांची आतापासूनच उभारणी करावी. त्यासाठी विकास आराखड्यात नियोजन करा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे रविवारी अधिकाऱ्यांना दिल्या.
विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या विकास आराखड्याचे सादरीकरण खासदार, आमदारांना दाखवण्यात आले. त्यात अनेकांनी सूचना दिल्या आहेत. आणखी एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर येत्या काळात होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्यांबाबत चर्चा होईल. तसेच भविष्यातील आणखी दोन महापालिकांच्या उभारणी संदर्भात देखील चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पवार म्हणाले, की गावांगावांतील रस्ते रेकॉर्डवर नसतील तर नंतर नागरिक त्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ करतात. कारण त्या परिसरातील जागेचे भाव नंतर प्रंचड वाढलेले असतात. परिणामी नागरिक जागा देताना विचार करतात, विरोध करतात. हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची दखल पीएमआरडीएने घ्यावी.
२३ गावांच्या आराखड्यात बदल करण्यास महापालिकेला अधिकार
पीएमआरडीने पुणे महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांबाबत आता विकास आराखडा केला आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे आराखडा हस्तांतरण झाल्यावर त्यात ते बदल करू शकतात. पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत आमच्याकडून राजकारण केलं जातं नाही, याबाबत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.