पुणे : औषधी ऑईल विक्री करुन मोठा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून ३१ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना सायबर पोलिसांनी मुंबईहून अटक केली आहे़. हेन्री चिकाडिबिया झिऑन(वय ३५) आणि एकी इसेन इफिआंग (वय २५, दोघे रा़. पलावा सिटी, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, जि ठाणे) अशी या जोडप्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी हडपसर येथील एका रियल इस्टेट एजंटला मोबाईलवरुन तसेच ई-मेलद्वारे संपर्क साधून आमच्या गोल्डरेर कॉस्मेटिक या कंपनीमध्ये प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लागणारे अॅकॅन्थस मॉलिश ऑईल हे भारतामध्ये स्वस्त दरात मिळते़. आम्ही शेतकऱ्यांकडून प्रति लिटर १ लाख ४२ हजार रुपये दराने विकत घेतो़. ते आमची कंपनी २ लाख ४८ हजार रुपये दराने विकत घेते़. या ऑईलच्या खरेदी करण्याबाबत त्यांच्या कंपनीला भारतामधील प्रतिनिधी म्हणून काम करावे, असे त्यांनी या इस्टेट एजंटला सांगितले़. मध्यस्थाचे काम करण्याबाबत व त्याद्वारे भरपूर नफा मिळण्याचे आमिष त्यांना दिले गेले़. तसेच या होणाऱ्या नफ्यामधील ४० टक्के रक्कम कमिशन म्हणून द्यावी, अशी मागणी केली़. त्यासाठी मॉलिश ऑईल खरेदी करण्याचे नावाखाली वेळोवेळी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात एकूण ३१ लाख ४२ हजार रुपये घेतले़. त्यानंतर पुढे काही न झाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी सायबर पोलिसांनी १२ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता़. या गुन्ह्यातील मोबाईल व ई मेलचा तांत्रिक अभ्यास करुन विश्लेषण केल्यावर दोघेही संशयित हे डोंबिवलीमध्ये रहात असल्याचे आढळून आले़. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस शिपाई नितेश शेलार, अनुप पंडीत, ज्योती दिवाणे या पथकाने डोंबिवलीमध्ये त्यांच्या शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले़ ते राहत असलेल्या फ्लॅटच्या झडतीमध्ये १ लॅपटॉप, ११ मोबाईल, १ इंटरनेट राऊटर, १ डोंगल तसेच २ डेबीड कार्ड, १ ओळखपत्र, ५ हजार ५२० रुपये असा माल हस्तगत करण्यात आला आहे़. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़.
औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:54 PM