लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएम सेंटरमध्ये अतिरिक्त डिव्हाईस बसवून एटीएम सिस्टीमची यंत्रणा हॅक करून बँकेची फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
डेव्हिड चारलेस उर्फ अगोचुकूऊ चारलेस नावाचूकाऊ ( वय ३०, सध्या रा. उंड्री, पुणे मूळ रा. नायझेरिया) आणि केहीनदे सादिक इद्रिस (वय २९ वर्षे, रा. व्यंकटेश पॅरेडाईज, उंड्री, पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की,
गुन्ह्यामध्ये एक महिला व एक पुरुष इसमांनी पुणे शहरातील बँकेच्या ठराविक ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन तेथे असलेली नेटवर्क केबल काढून ती त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त डिव्हाईसला जोडून ते डिव्हाईस एटीएम मशिनला हॅक करीत होते. त्यानंतर एटीएम मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकून १ हजार रुपये काढणेबाबत इनपुट देत होते. परंतु एमटीएम मशिनमधून हजार रुपये बाहेर न येता ५०० रुपयांच्या एकूण ४० नोटा असे २०हजार रुपये बाहेर येत होते. जोपर्यंत एटीएम मशिनमधील ५०० रुपयांचा ट्रे रिकामा होत नाही तोपर्यंत पैसे काढले जात होते. याबाबत बँकेस कळाल्याने बँकेने त्यांचा रोजचा ताळमेळ तपासला असता त्यामध्ये तफावत दिसून आल्याने बँकेने याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर तो पुढील तपासकामी सायबर पोलीस स्टेशकडे वर्ग करण्यात आला.. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले असता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे नायजेरियन देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे कोंढवा परिसरात जाऊन आरोपी व त्यांचे साथीदार यांचा शोध घेतला असता गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी ही आफ्रिकन इसम वापरत असल्याचे बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकासह आरोपी राहत असलेल्या भागात जाऊन शोध घेतला असता प्रथम डेव्हिड हा सापडला. त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारासह गुन्हा केला असल्याचे कबूल केला. त्यानंतर त्याचा साथीदार इद्रिस ला जेरबंद करण्यात आले.
यावेळी डेव्हिडच्या घरझडतीमध्ये ७ मोबाईल संच ३ लॅपटॉप, ०१ मोडेम २ पासपोर्ट व आरोपी इद्रिसच्या घरझडतीमध्ये ३ मोबाईल संच व १ लॅपटॉप असे जप्त करण्यात आले. तसेच त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी दोघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, कुमार घाडगे, उपनिरीक्षक रवींद्र गवारी, पडवळ, अंमलदार नितेश शेलार, अनिल पुंडलिक, नवनाथ जाधव, राजकुमार जाबा, शाहरुख शेख, नीलेश लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.