पुणे : विमानतळावर अडविलेले सोन्याचे दागिने व विदेशी चलनाचे पार्सल क्लिअर करण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेला लुटण्यासाठी नायजेरियन टोळीतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या टोळीने ६७ बँक खात्यांचा वापर करून त्यांनी तब्बल ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये लाटल्याची माहिती सहायक सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी न्यायालयाला दिली. आरोपींच्या घरझडती दरम्यान २१ मोबाईल, १ हार्ड डिस्क, ५ नेट डोंगल,३ पेन ड्राईव्ह , ४ लॅपटॉप, ८ मोबाईल व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्यानुसार टोळीतील जँगो निकोलस (वय २९), माँण्डे ओकेके (वय २६, दोघेही रा. निहाल विहार फेज २, निलोठी एक्सटेंशन, नवी दिल्ली) यांना न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याप्रकरणात, आणखी एक जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर २०२० ते २१ एप्रिल २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. गुन्ह्यातील रक्कम जप्त करायची असून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांची पडताळणी करायची असून तांत्रिक विश्लेषण करायचे असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अॅड. काळवीट यांनी केली.