पुणे: धरणात अपुरा पाणी साठा असल्याने महापालिकेने दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. शहरात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा गैरफायदा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी घेत असल्याचे उघड झाले आहे. टँकरसाठी दरमहा प्रत्येकी २० हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांना सापळा लावून पकडण्यात आले. उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय ५६), कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे (वय ३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या उन्हाळ्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती. लोकांना पाणीच्या कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात होती. त्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला पकडलेही होते. तरीही पाणी पुरवठा विभागातील लाचखोरी कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरमार्फत पाणी पुरवठा करणे हा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक असणारे पास मनपा कार्यालयातून घेतले असून प्रत्येक टँकर भरताना १ पास द्यावा लागतो. परंतु, पास देऊन सुद्धा कनिष्ठ अभियंता अजय मोरे हे दर दिवशी ५ पेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास महिना २० हजार रुपयांची मागणी केली. तसेच मधुकर थोरात याने तक्रारदार यांचे अनामत रक्कमेचे बील काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पडताळणी केली. त्यात मधुकर थोरात आणि अजय मोरे या दोघांनी प्रत्येकी २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बंडगार्डन पाणी पुरवठा विभागात सापळा रचण्यात आला. दोघांना प्रत्येकी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
एकाची दुसऱ्याला नाही माहिती
बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात मधुकर थोरात आणि अजय मोरे या दोघांच्या केबिन काही अंतरावर आहेत. मात्र, त्यांनी एकाच टँकरचालकाकडे दोघांनीही प्रत्येकी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची एकमेकांना माहिती नव्हती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय दक्षता घेऊन एका कारवाईचा सुगावा दुसऱ्याला न लागू देता एका तक्रारदारामार्फत दोघांवर एका पाठोपाठ कारवाई केली. एकाच कार्यालयात एका पाठोपाठ दोन कारवाया करण्याची ही पहिलीच वेळ आहे.