पुणे : ब्रिटनहून पुण्यात आलेले अन् महापालिकेला थांगपत्ता न लागू देणारे प्रवासी पुणे पोलिसांनी शोधून काढले आहेत़ त्यांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून, यापैकी २ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.
दोन प्रवाशांना नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, या पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्ट्रेन) आहे का ? याकरिताचे तपासणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत़ आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरपासून ब्रिटनहून पुण्यात आलेल्या ६३३ प्रवाशांपैकी १०९ जणांचा थांगपत्ता लागत नव्हता़ त्यामुळे सदर प्रवाशांची नावे पुणे पोलिसांकडे पत्ते शोधण्यासाठी महापालिकेने दिली होती़
पुणे पोलिसांनी यात मोठे सहकार्य करून या १०९ जणांचा शोध घेतला असता, यापैकी ३८ जण हे पुणे महापालिका हद्दीतील असल्याचे आढळून आले़ यानुसार गेल्या दोन दिवसात ३८ जणांपर्यंत आरोग्य विभागाची यंत्रणा पोहचली व त्यांची तपासणी केली गेली़ यात १२ डिसेंबरला ब्रिटनहून पुण्यात आलेल्या व लुल्लानगर येथे रहिवास असलेली ४० वर्षीय महिला व ७ वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे़
दरम्यान नायडूमध्ये दाखल असलेल्या सहा पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे का ? याचा अहवाल शुक्रवारी येणार आहे़ तर कोरोना विषाणुच्या नवीन स्ट्रेनची बाधा झालेला नायडू रूग्णालयातील एक रुग्ण सोमवारी (दि. ३) रोजी बरा होऊन घरीही परतला असून, या रुग्णाच्या कुटूंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
============================