दौंड : तालुक्यातील कुरकुंभ आणि अन्य एका गावांत डेंग्यूचे प्रत्येकी एक प्रमाणे दोन रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात नगर परिषदेच्या वतीने धुराळणी आणि फवारणीचे काम सुरु झाले आहे. एकंदरीतच पिंपळगाव, केडगाव या दोन गावाला यापूर्वी डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले, तर सध्याच्या परिस्थितीत कुरकुंभ आणि अन्य एका गावांतील डेंग्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानुसार सदरची बाब गंभीर असली तरी ग्रामपंचायत पातळीवर डेंग्यूच्या संदर्भात उपाययोजना केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणावर कचऱ्यांचे ढिगारे साचलेले आहेत. तर काही ठिकाणी गटारेदेखील तुंबलेल्या आहेत. तेव्हा पंचायत समिती प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींना डेंग्यूसंदर्भात सतर्क राहून त्यावर उपाय योजना करण्यासाठी सूचना करण्यात याव्यात, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. तसेच शहरातील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात याकामी लक्ष देणे गरजेचे आहे. तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या गणात आणि गटात डेंग्यू संदर्भात जागरुक राहून यावर उपाययोजनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र यांनीदेखील आपापल्या परिसरात सतर्क राहावे, अशी मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
दौंड तालुक्यात डेंग्यूचे दोन रुग्ण
By admin | Published: November 04, 2014 3:58 AM