भोर वनविभागाच्या डोंगरांना वणवा लागत आहे. त्यामुळे वनातील पक्षी-प्राणी हे शेतीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वास्तव करत असल्याचे चित्र दिसत आहे. रविवार (दि. २८) रोजी वीसगावा खोऱ्यातील बाजारवाडी गावाच्या शिवारात शेतकरी तानाजी शिंदे हे शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यास जात असताना ओढ्याच्या शेजारील शेतात एक मोर मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहिले. दुसरा मोर मृत्यूशी झुंज देत गवताच्या जाळ्यात तडफडत होता. हे दिसताच त्यांनी वनसंरक्षक पांडुरंग गुठ्ठे, वन कर्मचारी आकाश चव्हाण,धैर्यशील चव्हाण यांना माहिती दिली. वन कर्मचारी यांनी मोरास पाणी पाजल्यावर त्याचा मृत्यू झाला.
वनपरीक्षक अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदशना खाली मृत्यू झालेल्या मोरांना भोर येथील पशू चिकित्सालयात तपासणीसाठी आणण्यात आले. विषारी वनस्पतीमुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे नमुने पूर्व तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत. भाटघर येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात या मोरांना अग्नी देण्यात आला.
चौकट - वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
शासनाकडून ‘झाडे लावा- झाडे जगवा’चा नारा दिला जातो. मात्र, भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील डोंगराला दर वर्षी
वणवा लावला जातो. गवत चांगले उगवावे या गैरसमजुतीपोटी हे वणवे लावून मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान केले जाते. वणवे लावणाऱ्यांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची मागणी होत असून, कडक कारवाई झाली तरच हे प्रकार थांबणार आहे.
बाजारवाडी (ता. भोर) येथील शिवारात दोन मृत्यू पावलेले मोर वनविभागाच्या ताब्यात देताना शेतकरी तानाजी शिंदे व वन कर्मचारी फोटो