पुणे : शहरात वेगवेगळ्या तीन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मगरपट्टा उड्डाणपूल, सासवड रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या या घटना घडल्या.
मगरपट्टा उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सीताबाई देविदास पानसरे (वय ४५, रा. धनराज कॉलनी, मगरपट्टा, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. पानसरे या शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मगरपट्टा उड्डाणपुलाजवळून निघाल्या होत्या. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. याप्रकरणी ट्रकचालक अर्जुन विश्वनाथ कोकाटे (वय ३४, रा. मोहा, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) याला अटक करण्यात आली.
हडपसर-सासवड रस्त्यावर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार युवकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तुषार मारूती खेत्रे (वय ३१, रा. कोरोळी, ता. बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या मोटाराचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तो फिरस्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पादचाऱ्याचे वय अंदाजे ३५ वर्षे असून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.