पुणे : ओमायक्रॉन व्हेरिएंट या विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. हा नवा विषाणू किती प्रमाणात घातक आहे यावर अजून संशोधन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर लक्षकेंद्रित केले जात आहे. कालच दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. आता पिंपरी चिंचवड शहरात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.
नवीन व्हेरिएंट असलेल्या 12 देशात नायजेरियाचा समावेश नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले. त्या दोघांना जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनियन सिक्वेन्सला पाठविले आहेत.
नायजेरियातून पंचवीस नोव्हेंबरला पिंपरी- चिंचवड शहरात आई आणि मुलगी आल्या होत्या. त्यादिवशीही दोघांनी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु, महापालिकेने २९ नोव्हेंबरला केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांचा मुलगाही पॉझिटिव्ह आला आहे. तो नायजेरियाला गेला नसल्याचे विभागाने कळवले आहे.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या – कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.
पुणे शहरातही एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. त्याला घरीच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची आरटीपीसीआर चाचणी महापालिकेने केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. दक्षिण आफ्रिकेतील कोव्हीड विषाणूच्या उत्परीवर्तीत प्रकाराचा ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन, महापालिकेने परदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल या देशातून कोण नागरीक आले आहेत का, याची माहिती सध्या महापालिका गोळा करत आहे.