तळेगाव दाभाडे :जबरी चोरी करून ओला कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी फरारी असलेल्या दोन आरोपींच्या पिंपरी -चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली. वैभव उर्फ पिंटू धनराज बिजेवार (वय ३३, रा. हनुमान गल्ली, नागपूर) आणि दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय २५, रा. मोशी, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक(गुन्हे)भानुदास जाधव यांनी दिली.या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.खून प्रकरणातील वैभव आणि दिगंबर या आरोपींना मोठया शिताफीने नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून २ देशी बनावटीचे गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे आणि एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.इंदोरी - जांबवडे रस्त्यावरील पवार शेतीजवळ रस्त्याच्या कडेला ज्ञानेश्वर किसन वरबडे (वय २रा.बालघरे वस्ती, कुदळवाडी ,चिखली) या तरुणाचा गोळ्या घालून निर्घृण करण्यात आला होता.खुनाचा हा प्रकार मंगळवारी सकाळी (२१मे)उघडकीस आला.यासंदर्भात इंदोरीचे पोलीस पाटील जयदत्त शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली होती.या खून प्रकरणाने मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती.
नेमकी घडलेली गटना काय....ज्ञानेश्वर हा ओला कॅब चालविण्याचे काम करत होता. २० मे रोजी वैभव आणि दिगंबर यांनी ज्ञानेश्वर याची कॅब बुक केली. बराच वेळ दोघांनी कॅब फिरवली. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी - जांबवडे रस्त्यावर दोघांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात आणि पोटात गोळ्या घालून खून केला. आरोपींनी ज्ञानेश्वरचे एटीएम कार्ड आणि कार घेऊन पोबारा केला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताची ओळख पटवणे आणि त्याचे मारेकरी शोधणे हे एक पोलीस यंत्रणेपुढे आव्हान होते.पोलीस यंत्रणेपुढे एक आव्हान होते. या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस संयुक्तरित्या करीत होते. तांत्रिक आणि अन्य मुद्द्यांचा तपास घेत पोलिसांनी ज्ञानेश्वरची ओळख पटवली. तो ओला कॅब चालविण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना त्याची ओला कॅब खेड तालुक्यातील सावदरी येथे मिळाली. कॅबमधील बुकिंग टॅबलेटच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. आरोपींना अटक वैभव आणि दिगंबर हे खून केल्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर नागपूर येथे गेल्याचे पोलिसांना तांत्रिक तपासात आढळले. दरम्यान त्यांनी ज्ञानेश्वर याच्या एटीएममधून १३ हजार ५०० रुपये काढून घेतले. गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे संयुक्त पथक नागपूरला तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी दोघांना नागपूर मधून ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकू जप्त केला. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) भानुदास जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,तळेगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस कर्मचारी मयूर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारूक मुल्ला, प्रवीण देळे, नारायण जाधव, संदीप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुषार शेटे यांच्या पथकाने केली.