पुणे - पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. शिवाजीनगर रेल्वे स्थानकानजीक असलेले हे लोखंडी होर्डिंग तुटून रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर पडले. यात सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले. तसेच अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात देहूरोडमधील शामराव धोत्रे(48), पिंपळे गुरवमधील भीमराव कासार(70), नानापेठेतील शिवाजी परदेशी(40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे. तर उमेश धर्मराज मोरे (36), किरण ठोसर (45), यशवंत खोबरे (45), महेश वसंतराव विश्वेशवर (50), रुख्मिनी परदेशी (55) हे गंभीररीत्या जखमी असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तर समर्थ परदेश(4), समृद्धी परदेशी(18) यांना किरकोळ दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेल्वेला महापालिकेने सदर होर्डिंग काढण्यासाठी 2013 पासून वारंवार पत्र दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महापालिकेने केला आहे. होर्डिंग काढताना थेट मागील सपोर्ट काढल्याने पूर्ण होर्डिंग कोसळून अपघात झाला. या ठिकाणी 40 बाय 20 या मापाच्या सर्वात मोठ्या होर्डिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र या होर्डिंगने सर्व नियम तोडले असून दिलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी मोठे होर्डिंग लावण्यात आले होते, अशी माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त विजय दहीभाते यांनी दिली.