ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ शनिवारी(6 मे) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून येणा-या टॅकर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (वय 14 ) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय 36), राजू विश्वनाथ पंडीत (वय 35), कांताबाई मरीबा उजगर (वय 45), इंदु राजु पंडीत (वय 33), व ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (वय 23) हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली.