पुणे : ग्राहकांनी अॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तू काही कारणामुळे परत केल्यानंतर त्याची कंपनीच्या सर्व्हरमध्ये नोंद होत नव्हती़. अशा वस्तूंची विक्री करुन कंपनीला २४ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना सायबर क्राईमने अटक केली आहे़. त्यापैकी एक कंपनीचा कामगार असून तो गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत काम करीत होता़. त्यांच्याकडून १७ लाख १३ हजार रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत़. राशिद जुम्मन चौधरी (वय २६, रा. धानोरी) व अचल अमोल माणगावकर (वय २६, रा. धानोरी, मूळ-सावंतवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राशिद हा अॅमेझॉन कंपनीचा कामगार असून त्याचे शिक्षण बी.कॉम झाले आहे. तर अचल राशिदचा मित्र असून त्याने डिप्लोमा इन इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. कंपनीत कामाला असल्याने ग्राहकाने अॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेली वस्तू कंपनीकडे माघारी पाठविल्यास कंपनीकडून नवीन वस्तू ग्राहकाला पाठविली जात होती़. मात्र, परत केलेल्या वस्तूची नोंद अॅमेझॉनच्या सिस्टिममध्ये अपडेट होत नव्हती़. त्याची माहिती रशिदला होती़ ग्राहकाने परत केलेली वस्तू कंपनीला मिळत नसल्याने अॅमेझॉन कंपनीने अलंकार पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली होती़. या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्यामार्फत तपास करीत असताना अॅमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरुन वारंवार एकाच आयडीवरुन हा प्रकार होत असल्याचे निष्पन्न झाले़. त्याची माहिती कंपनीकडून मिळताच त्याद्वारे तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपी सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी सावंतवाडी येथून अचल माणगावकर याला ताब्यात घेतले़. त्याच्याकडून माहिती मिळाल्यावर त्याचा साथीदार राशिद चौधरी याला पकडले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राशिद व अचल याने १५ ते २० बनावट ई मेल आयडी तयार करुन त्यावरुन विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू मागविल्या होत्या़. त्या वस्तू खराब असल्याचे कारण देत दोघांनी त्यात परत केल्याचे दाखवित़ प्रत्यक्षात त्या परत न करता त्यांची ओएलएक्सवर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले़ दोघांनी या वस्तूची चोरी करत असल्याची कबुली दिली़. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, गावडे, हंडाळ, वाव्हळ, पोतदार, वेताळ, जाबा, निकम, जाधव, पुंडलिक, भोरडे, शेख यांच्या पथकाने केली.
अॅमेझॉन कंपनीला गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 9:49 PM
अॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तू काही कारणामुळे परत केल्यानंतर त्याची कंपनीच्या सर्व्हरमध्ये नोंद होत नव्हती़..
ठळक मुद्देसायबर क्राईमने केली कारवाई : १७ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त