पुणे : संगमघाट येथील पार्किंग मध्ये झोपलेल्या एका तरुणाच्या डोक्यात वार करुन खुन करण्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत दोघांना अटक केली. तर त्यांचा अन्य एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निखील उर्फ भैय्या दिगंबर कांबळे व प्रदिप उर्फ गोट्या गोरख कटारनवरे, (वय-25, राहणार दोघेही ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगेश विष्णु कांबळे (29,रा.मंगळवार पेठ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सुरवातीला अज्ञात वेक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लॉक डाऊननंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खुन आहे. चिलीम ओढण्याच्या कारणातून झालेल्या वादातून खून झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांकडे चौकशी करुन प्रथम मृतदेहाची ओळख पटविली तेव्हा त्याचे नाव मंगेश विष्णू कांबळे, रा. मंगळवारपेठ) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगेशच्या आई व भाऊ यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मंगेश नशापाणी करीत असल्याने आमच्याबरोबर राहत नव्हता. तो कोणतेही काम करुन कोठेही राहत असे. त्याचा राहण्याचा एक ठावठिकाणा नव्हता. दरम्यान संगम घाटावर नशापाणी करणारे व फिरस्ते यांच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता मंगेशची मंगळवारी घाटावर दोघा तिघा बरोबर भांडण झाल्याचे समजले. त्यानुसार त्यातील एक व्यक्ती ताडीवाला रोड भागातील नदीकिनारी असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला तेव्हा दोघांनी खून केल्याची कबुली दिली. आणखी त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, कर्मचारी निखिल जाधव, गौरव उभे, सागर जगताप, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, किरण तळेकर, हरीष मोरे यांच्या पथकाने केली आहे.
चिलीम ओढण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक, संगमघाट येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:59 PM
बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत केली दोघांना अटक
ठळक मुद्देलॉक डाऊननंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खुन