पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन केला आहे. अशातच राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने व्यसनाधीन लोकांची मोठी 'गोची' झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही तळीरामांनी तर चक्क दारूची दुकानेच फोडून दारूच्या बाटल्या चोरून नेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. अशातच पुण्यातील खडकवासला भागात दोन महाभागांनी शक्कल लढवित महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा गणवेश घालून गांजा घेऊन जाताना पोलिसांनी पकडले आहे . याप्रकरणी हवेली पोलिसांनी ऋषी रवींद्र मोरे (वय : २० वर्षे, तावरे कॉलनी, पर्वती, पुणे) व सागर चंद्रकांत सुर्वे (वय: २५ वर्षे, शिवदर्शन, पर्वती, पुणे) या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे व्यसनी लोकांना सध्या कोणताच मादक पदार्थ मिळत नाही. परंतु संचारबंदीच्या काळात पोलिसांनी अडवू नये म्हणून दोन महाभागांनी ह्यावर अनोखी शक्कल लढवली. महापालिकेच्या मयत झालेल्या कर्मचाऱ्याचा गणवेश एकाकडे होता. त्याने तो गणवेश स्वत:च्या मापाचा करून घेतला,आणि हाच गणवेश घालून हा पठ्ठ्या मित्रासह गांजा आणण्यासाठी खडकवासला येथे गेला. खडकवासला येथे हवेली पोलिसांच्या वतीने नाकाबंदी सुरु आहे. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्ही महापालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना त्यांच्या बोलण्याचा संशय आल्याने त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळला. दोघांकडून एकवीसशे रुपयाचा गांजा जप्त केला. शहरात संचारबंदी आहे तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी करीत असताना गुंगीकारक,मादक औषधे आणि मानसिक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ दोघांजवळ आढळल्याने हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. पर्वती परिसरातील पाच ते सहा जणांनी पैसे गोळा करून गांजा आणायला सांगितल्याचे दोघांनी सांगितले. पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके करीत आहेत.