पुणे : शाळा, कॉलेजमध्ये भाड्याने गाडी लावतो, असे सांगून ती परस्पर विकून फसवणूक करणाºया दोघांना सिंहगड रोड पोलिसांनीअटक केली आहे. संग्राम संभाजी नाईक (वय ३०, रा. उंड्री) आणि युवराज नितीन गोसावी (वय ३४, रा. वज्रेश्वरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी राहुल शिवाजी ढेरे (वय ३०, रा. डहुडळगाव, आळंदी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल ढेरे यांची महिंद्र स्कॉर्पिओ गाडी पुण्यातील शाळा, कॉलेजमध्ये भाड्याने लावतो, असे सांगून त्यांच्याबरोबर आरोपींनी स्टॅम्प पेपरवर करार केला. दीड वर्षापूर्वी त्यांच्याकडून गाडी ताब्यात घेतली.
त्यानंतर काही महिने भाडेही दिले. मात्र, त्यानंतर त्यांनी भाडे थकविले. त्यांनी गाडी परत मागितली असता दिली नाही. त्यांची गाडी परस्पर रणजित देशमुख (रा. अकलुज, जि. सोलापूर) याला विकून फसवणूक केली़. त्याचप्रमाणे त्यांचा मित्र सचिन होणाळकर यांची मारुती सुझुकी सियाज ही गाडी त्यांच्या संमतीशिवाय परस्पर विकून फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.
तुमची कार मोठमोठ्या कंपनीकडे भाड्याने लावतो, असे सांगून गाड्या घेऊन त्या परस्पर विकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये याप्रकरणी यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले होते.