पुणे : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवेली पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती माणिक कोलते (वय ५५) आणि पोलिस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्यावर हवेली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आवश्यक ती मदत करण्यासाठी कोलते याने तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपतने २६ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यावेळी १० हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
सिंहगड रस्त्यावरील अभिरूची पोलिस चौकी समोर मंगळवारी सापळा रचण्यात आला. कोलते यांच्यावतीने जगताप याला १० हजार रूपयांची लाच घेताना अटक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे अधिक तपास करत आहेत.