पुणे : राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बहिणीला सहआरोपी करु नये, यासाठी पुण्यात ५०हजार रुपयांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजस्थानमधील दोघा पोलिसांना अटक केली आहे़ सहायक पोलीस उपनिरीक्षक रामलाल छगनलालजी गुर्जर (वय ५६), पोलीस शिपाई प्रेमसिंग धरमसिंग जाटव (वय २६, दोघे रा़ आंबामाता पोलीस ठाणे, उदयपूर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांचे मेव्हणे (बहिणीचे पती) यांच्याविरुद्ध आंबामाता पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे़ या गुन्ह्याच्या तपासासाठी रामलाल गुर्जर व प्रेमसिंग जाटव हे पुण्यात आले होते़ त्यांनी तक्रारदारांच्या मेव्हण्याचा पुण्यात शोध घेतला पण ते सापडले नाही़ त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून या गुन्ह्यात तुमच्या बहिणीलाही सहआरोपी न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यावर रविवारी त्याची पडताळणी करण्यात आली़ ३ लाख रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर पुणे स्टेशन येथील शिवम येथे सापळा रचला़ तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये घेताना दोघांना पकडण्यात आले़ बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय सेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप चव्हाण यांनी केले आहे़.
राजस्थानमधील दोन पोलिसांना लाच घेताना पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 9:32 PM