पुणे : मकरसंक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजी केल्यामुळे धनकवडी परिसरात दोन पोलिस जखमी झाल्याची घटना रविवारी घडली आहे. तसेच अनेक पक्षीही जखमी झाले आहेत. बंदी असतानाही नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे दिसून आले आहे.
हा अपघात पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला. महेश पवार आणि सुनील गवळी अशी गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर मुख्यालयात नियुक्तीस आहेत. रविवारी दुचाकीवरून ते जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने महेश पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली, तर त्यांच्यासोबत असलेले सुनील गवळी यांचा हात मांजाने कापला गेला. पक्षिमित्र बाळासाहेब ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
नायलॉन मांजांमुळे नागरिक व पक्षी जखमी होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील चोरीच्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री केली जाते. त्यातूनच सध्या नायलॉन मांजे सर्वत्र पहायला मिळत आहेत. त्याने मकरसंक्रांतीला अनेकजण जखमी झाले. त्यात या दोन पोलीसांचाही समावेश आहे. तसेच पक्षी देखील त्यात अडकून जखमी झाल्याचे पहायला मिळाले.
दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक
नायलॉन मांजा वापरून पतंग बराच काळ उडवता येतो, या धारणेमुळे त्यांचा वापर होतो. परंतु, नागरिकांनी त्याचे दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक आहे. त्यावर बंदी घातलेली आहेच. लोकांनी ते वापरू नये. तरच पक्षी, नागरिक जखमी होणार नाहीत. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन