पुणे : येरवडा मनोरुग्णालयातून कर्मचाऱ्यांना मारहाण करून दोघा मनोरुग्णांनी पलायन केल्याची घटना गुरूवारी घडली. कर्मचाऱ्यांना मारहाणीची मागील पाच महिन्यातील दुसरी घटना आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, रुग्णालयात सुरक्षारक्षकांची नेमणुक करण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच राज्य शासनाला पाठविला असून अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.येरवडा कारागृहात शिक्षा भोगणारे काही कैद्यांना मनोरुग्णालयात दाखल केले जातात. याठिकाणी त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. काही दिवसांपुर्वी दोन कैद्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी गुरूवारी येथील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर वार करून पळ काढल्याची घटना घडली. या घटनेनंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयामध्ये सध्या १६ मनोरुग्ण कैदी आहेत. त्यातील १० ते १२ जणांवर खुनाचे गुन्हे आहेत. त्यांच्यापासून कर्मचाऱ्यांना नेहमी भीती असते. पाच महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.राज्यात पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर येथे मनोरुग्णालये आहेत. पुणे वगळता अन्य तीन रुग्णालयांमध्ये मनोरुग्ण कैदी असल्यास पोलीस संरक्षण पुरविले जाते. येरवडा रुग्णालयात दुपारी केवळ दोन पुरुष व एक महिला कर्मचारी असतात. त्यामुळे १६ मनोरुग्ण कैद्यांसाठी इतर मनोरुग्णालयांप्रमाणेच पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे कर्मचारी म्हणाले. दरम्यान, मनोरुग्णालयामध्ये सुरक्षारक्षक नेमण्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्तांशीही चर्चा झाल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
येरवडा मनोरुग्णालयातून दोन कैद्यांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:43 PM
रुग्णालयामध्ये सध्या १६ मनोरुग्ण कैदी आहेत. त्यातील १० ते १२ जणांवर खुनाचे गुन्हे आहेत. त्यांच्यापासून कर्मचाऱ्यांना नेहमी भीती असते.
ठळक मुद्देपोलीस संरक्षण द्या : कर्मचाऱ्यांची मागणीकर्मचाऱ्यांना मारहाणीची मागील पाच महिन्यातील दुसरी घटना