पाटेठाण : पिलाणवाडी (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्यांच्या उसाच्या फडात सोमवार (दि. १४) रोजी ऊसतोडणी चालू असताना बिबट्याचे बछडे दिसून आले. यामुळे ऊसतोड कामगार, मजूर महिलांसह स्थानिक शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पिलाणवाडी येथील शेतकरी रोहीदास झरांडे यांच्या उसाच्या शेतात तोडणी चालू आहे. सोमवारी दुपारच्या सुमाराला ऊसतोडणी करत असताना मजुरांना उसाच्या पाचटावर बिबट्याचे दोन बछडे नजरेस पडली. ही बातमी मजुरांनी तत्काळ शेतकरी झरांडे यांना सांगितली. त्यांनी व पोलिस पाटील लक्ष्मण कदम यांनी लगेचच वन विभागाकडे संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यानंतर वन परिमंडल अधिकारी येळे, वनरक्षक विकास वाघमारे, कर्मचारी सुरेश पवार, विलास होले घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी व भीतीने दोन्ही बछडे उसात आसरा घेऊन बसली आहे. यापूर्वी या परिसरात अनेकदा बिबट्यासदृश प्राणी नजरेस पडल्याने वन विभागाकडून या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. परंतु अद्यापही हा वन्य प्राणी पिंजऱ्याआड करण्यात वन विभागाला यश आले नाही. आज मंगळवार (दि.१५) रोजी दिवसभर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी या दोन बछड्यांना पकडण्यासाठी ठाण मांडून बसले होते. संपूर्ण उसाच्या फडाची उसतोड होऊन देखील ही लहान पिल्ले काही बाहेर आली नसून यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून लोकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)
पिलाणवाडीत आढळली बिबट्याची दोन पिल्ले
By admin | Published: December 16, 2015 3:20 AM