पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील खंदकातून दोन सांबरांनी सोमवारी पळ काढला आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खंदकाच्या भिंतीखालील माती वाहून गेली आणि तिथे भगदाड पडले. त्यातून हे दोन सांबर सोमवारी सकाळी पळाले आहेत. त्या सांबरांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाची टीम काम करत आहे.
प्राणिसंग्रहालयाच्या आतमध्ये प्रवेश गेल्यावर काही अंतर चालल्यानंतर डाव्या बाजूला सांबरांचे खंदक आहे. या खंदकात २० पेक्षा अधिक सांबरांची संख्या आहे. त्या ठिकाणी एका बाजूला प्राणिसंग्रहालयात चालण्याचा रस्ता आहे, तर दुसरीकडे खंदकाला भिंत आहे. रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्या पावसामुळे खंदकाच्या भिंतीखालील जमीन वाहून गेली. त्यामुळे तिथे भगदाड पडले. ते कोणाच्या लक्षात आले नसेल, त्यामुळे सकाळी सांबरांना दिसल्याने ते त्यातून बाहेर पडले असावेत.
मादी सांबर, पिल्लू खंदकाबाहेर?
खंदकाच्या सीमाभिंतीला भगदाड पडल्याने त्या जागेतून मादी सांबर आणि पिल्लू बाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण नर सांबराला मोठी शिंगे असतात. त्यामुळे ते त्या जागेतून बाहेर जाण्याची शक्यता कमीच आहे. त्याची शिंगे त्या जागेत अडकू शकतात.
सांबरांना पकडणे अवघड
खंदकातून जी दोन सांबर पळाली आहेत, त्यांना पकडणे अत्यंत अवघड आहे. कारण सांबर हा अतिशय चंचल प्राणी आहे. थोडी जरी हालचाल झाली तरी तो सतर्क होऊन पळतो. त्याला पकडण्यासाठी एक तर मोठ्या जाळीचा वापर करावा लागणार आहे किंवा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्यांना पकडावे लागेल.
हरणाची मुख्य जात सांबर
सांबर हरीण हे हरणाची मुख्य जात आहे. भारतात आढळणाऱ्या हरणांमध्ये आकाराने सर्वात मोठे असे हे हरीण आहे. खांद्यापर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटरपर्यंत भरते. तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलोपर्यंत भरू शकते. याची वर्गवारी हरणांच्या सारंग कुळात होते. या कुळातील हरणांच्या मादींना शिंगे नसतात. माद्या नेहमी कळप करून राहतात. सांबरांचे खाद्य गवत, पाने, फळे इत्यादी आहे.
''रविवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खंदकाच्या सीमाभिंतीखालील माती वाहून गेली. त्यातून दोन सांबर बाहेर गेले आहेत. त्यांना पकडण्यासाठी आमची टीम काम करत आहे. मी एका काॅन्फरन्ससाठी पुण्याबाहेर आहे. - राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज''