जेजुरी : दहावीत शिकणाऱ्या दोन मुलींना क्लास संपल्यानंतर घरी परतताना नीरेकडून जेजुरीकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोचा धक्का लागल्याने प्राण गमवावे लागले. या वेळी एक मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना आज घडली. हा अपघात वाल्हे (ता. पुरंदर) नजीक सुकलवाडी फाट्याजवळच झाला. अमृता विश्वास सातपुते व निकिता सुनील पवार (वय १५, रा. सुकलवाडी, वाल्हे) यांचा मृत्यू झाला, तर ऐश्वर्या बंडू पवार ही गंभीर जखमी झाली आहे. जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८) सकाळी या तिघी सायकलवरून वाल्हे येथे खासगी क्लाससाठी आल्या होत्या. ८ वाजण्याच्या सुमारास क्लास संपवून परत घरी जाताना नीरेकडून जेजुरीकडे जाणाऱ्या समोरून आलेल्या मालवाहतूक टेम्पोने (एमएच ४२-बी ४७८५) त्यांना धडक दिली. धडकेनंतर टेम्पो विरुद्ध बाजूला रस्त्याच्या कडेला गाळामध्ये रुतून बसला. तर, या तिन्ही मुली रस्त्यालगतच्या चारीमध्ये पडल्या. यामध्ये अमृता व निकिता या जागीच ठार झाल्या, तर ऐश्वर्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर टेम्पोचालक गाडी सोडून फरार झाला. घटनास्थळी या विद्यार्थिनींच्या सायकली मोडलेल्या अवस्थेत, दप्तरे विखुरलेली, चपला तसेच परिसर रक्ताच्या थारोळ्याने माखला होता. घटना थरकाप उडवणारी होती.वाल्हेचे पोलीस हवालदार बनकर यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेनंतर संतत्प ग्रामस्थांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये सदर टेम्पोचालकाला हजर करण्याची जोरदार मागणी केली. वातावरण तणावग्रस्त झाले होते. यातच ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवा नसल्यामुळेही जमाव चिडला होता. घटनेच्या पंचनाम्यानतर पोलिसांनी या टेम्पोतील माल उतरवण्यासाठी गाडी जेजुरी एमआयडीसीमध्ये नेल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागताच वातावरण आणखीच बिघडले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांसह भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, हे जेजुरी ग्रामीण रुग्णालयात हजर झाले. पोलिसांनी टेम्पोचालक नितीन रामचंद्र खलाटे (वय ४१, रा. लाटे, ता. बारामती) याला बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. स. पो. नि. रामदास वाकोडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
टेम्पोच्या धडकेने दोन शाळकरी मुली ठार
By admin | Published: July 09, 2016 3:48 AM