सुस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक गादी कारखाना आणि गॅरेज जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाली ११ वाजता घडली. स्थानिक तरुणांनी तातडीने टँकर बोलावत तसेच पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुस येथे ज्ञानेश्वर कृष्णा चांदेरे यांचे कुलस्वामिनी गादी कारखाना तसेच बाजूला एक गॅरेज आहे. शनिवारी ११ वाजता गादी कारखान्यात काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. कारखान्यात असलेल्या कापसमुळे आगीने लगेच उग्र रूप धारण केले. स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तातडीने दोन टँकर बोलावले. दरम्यान, पाषाण येथील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन केंद्रालाही ही माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात पालिकेचा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. तासा भरानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. माजी सरपंच नारायण चांदेरे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. थोड्याच वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस हवालदार व्ही एल राठोड पुढील तपास करत आहेत.
चौकटतर मोठी दुर्घटना झाली असतीगादी कारखान्याच्या शेजारी एच. पी. गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी सिलेंडर असतात. मात्र स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली