वाघोली: वाघोली येथे डब्लूएस बेकर्स कारखान्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून ४० लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने पर्दाफाश केला असून दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. टोळीतील इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहे.
दीपक केवल दुबे (वय २२), अरुण केवल दुबे (वय २४, दोघेही रा. कारिवलीगाव, भिवंडी) असे गोडाऊनचोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील कावेरी हॉटेल समोर असणाऱ्या डब्लूएस बेकर्सच्या पाठीमागील बाजूस लाईफ केअर लॉजिस्टिकचे गोडावून आहे. यामध्ये पॅनासॉनिक कंपनीचे कॅमेरे, मिक्सर, हेअर ड्रायर अशा विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या होत्या. सुट्टीमुळे बंद असलेल्या गोडावूनच्या भिंतीला चोरट्यांनी दोन फुटांचे भगदाड पाडून आतमध्ये ठेवलेल्या ४० लाख रुपये किमतीच्या २८ प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी दीपकसिंग राणा यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे.
चोरीमध्ये गेलेल्या मोबाईलचा पोलिसांनी तपास केला असता भिवंडी येथून दोघांना डी बी पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या काही वस्तू देखील मिळाल्या आहेत. पोलिसांनी पर्दाफाश केलेली टोळी गोडाऊन फोडण्यामध्ये सराईत असून त्यांच्यावर भिवंडी येथे चार गोडाऊन फोडण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत. हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके व, सुरेशकुमार राऊत (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने दोघांना अटक केले असून इतर फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक हनमंत पडळकर, पोलीस कर्मचारी श्रीमंत होनमाने, समीर पिलाणे, सुरज वळेकर वेताळ यांनी केली.