पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमधील मलनिस्सारण वाहिन्या आणि दोन प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याकरिता पालिका निविदा प्रक्रिया राबविणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. तसेच, चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात यासाठीची पुरेशी तरतूद नसल्याचेही समोर आले आहे. तरीही पालिकेने ५३३ कोटी ५१ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेचा घाट घातला आहे.
शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा केशवनगर, साडेसतरानळी आणि लोहगाव या गावांच्या मलनिस्सारण व्यवस्थेकरिता पालिकेने मास्टर प्लान तयार केला आहे. आजमितीस या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या २०५ किलोमीटरच्या मलवाहिन्या दुरुस्त करणार आहेत. यासोबतच २१९ किलोमीटरच्या नवीन मलवाहिन्या टाकणार आहेत. मांजरी बुद्रुक आणि केशवनगर परिसरात दोन एसटीपी प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या कामासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत निविदा मागविल्या जाणार आहेत. पालिकेमध्ये याबाबत घेतलेल्या ‘प्री-बिड’ बैठकीला इच्छुक ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एसटीपीसाठीच्या जागा ताब्यात नसल्याने मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प (जायका) पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. हा अनुभव गाठीशी असताना या गावांमधील जागा ताब्यात येण्यापूर्वीच मलवाहिन्या व एसटीपी प्लांट बांधण्यासाठी निविदा प्रक्रियेचा घाट का घातला जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.