राहुल शिंदे
पुणे : कोथरूड येथील एमआयटी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयानंतर आता शिक्षण प्रसारक मंडळीच्या स.प.महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी व सर्वच शैक्षणिक संस्थांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काही महाविद्यालयांनी तर प्रॅक्टिकल असणारे अभ्यासक्रम सोडून इतर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन घ्यावेत का? असा विचार सुरू केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नवे निर्बंध लावले आहेत. राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून ऑफलाईन वर्ग सुरू ठेवले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाईन वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, तरीही महाविद्यालयांमधील विद्यार्थी कोरोना बाधित होत असल्याचे दिसून येत आहे.
मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव म्हणाले, कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले तर महाविद्यालयातील गर्दी कमी करावी लागेल. त्यामुळे प्रॅक्टिकल अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑनलाईन घ्यावेत का ? असा प्राथमिक स्तरावर विचार केला जात आहे.
''महाविद्यालयातर्फे कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन केले जात आहे.मात्र,काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महाविद्यालयाने या वर्गातील विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन वर्ग सध्या बंद आहे असे स.प.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सविता दातार यांनी सांगितले.''