पुणे : कामातील अनियमिततेचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील दोन अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले असले तरी चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. दोघांनाही निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली गेली. या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याचे प्रशासनाला सांगितले होते. मुंढे पदावर असेपर्यंत दोघेही कामावर रुजू झाले नाही. मुंढे यांच्या बदलीनंतर गुंडे यांनी फेब्रुवारी महिन्यात पदभार स्वीकारला. त्यानंतर तीन महिन्यांतच गवळी व माने यांना पीएमपीमध्ये पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचे कार्यालयीन परिपत्रकही काढण्यात आले आहे.गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मेपासून दोघांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. गवळी यांच्याकडे बीआरटी व आटीएमएस विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाच्या समन्वयाचे काम माने यांच्याकडे देण्यात आले आहे. तेथील प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, गवळी व माने यांचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले असले तरी त्यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार आहे. निलंबनाच्या काळात त्यांना काही वेतन द्यावेच लागत होते. त्यामुळे सेवेत घेऊन चौकशी केली जाईल.-----------------------
पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 6:27 PM
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती.
ठळक मुद्देनिलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले असले तरी त्यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार