पुणे : जिल्ह्याच्या दुर्गम भागात, वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलींना विविध कारणांमुळे सातवीनंतर शिक्षण सोडावे लागते. त्यांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे या मुली शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून त्यांच्या शिक्षण व राहण्याचा खर्च म्हणून महिन्याला दोन हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली. जिल्ह्याच्या वाड्या वस्त्यांवर, तसेच दुर्गम भागात सातवीपर्यंत शाळा आहे. मात्र, त्यानंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा तालुक्याच्या गावाला जावे लागते, तर काही विद्यार्थी शहरातही शिक्षणासाठी येतात. बाहेरगावी जावून शिक्षण घेणा-यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे. तर विद्याथीर्नी मात्र, सातवीनंतर शाळाबाह्य होतात, आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देऊन पालकांकडून त्यांना घरीच ठवेले जाते. दुर्गम भागात विशेषत: आदिवासी व भटक्या समाजात या मुलींची संख्या अधिक आहे. काही कुमारवयीन मुलींची सातवीनंतर लग्न लावून दिल्याचे प्रकारही पाहायला मिळतात. अशा शाळाबाह्य मुलींची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, गावापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या मुलींना राहण्याचा खर्च मिळावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. सातवीनंतर विद्यार्थिनी शाळाबाह्य होऊ नये, त्यांना माध्यमिक शिक्षण घेता यावे, यासाठी नव्याने ही योजना राबविण्यात येत आहे. काही तालुक्यात दरवर्षी जवळपास ५०विद्यार्थिनी शाळाबाह्य होत असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. सातवीनंतर शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थिनी संख्या गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत निश्चित करून त्यांना लाभ देण्यात येईल.- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
दुर्गम भागातील मुलींना मिळणार शिक्षण; महिन्याला मिळणार दोन हजार रुपयांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:28 PM
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतला पुढाकार
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे ३० लाखांची तरतूद दुर्गम भागात विशेषत: आदिवासी व भटक्या समाजात या मुलींची संख्या अधिककाही तालुक्यात दरवर्षी जवळपास ५०विद्यार्थिनी शाळाबाह्य होत असल्याचा प्राथमिक अहवाल